"सुटका"

लघु कथा
"सुटका"
लग्न पंधरा दिवसावर आले. दोन्ही घरच्यांची खरेदी जोरात चालू होती.
सुधा तर खूप खुश होती. कारण ऐका पिढीजात श्रीमंत घराण्यात तिचे लग्न ठरले होते.
घरी वडिलांची परिस्थिती बेताची. मध्यम वर्गीय. खूप गरिबी नाही आणि श्रीमंत नाही. खाऊन पिऊन सुखी.
आपल्या लेकीसाठी काय करू नी काय नको असे तिच्या आईबाबांना वाटत होते.
त्यांची बरोबरी तर करू शकत नाही. पण निदान त्यांच्या खालोखाल तरी.
आज तर सुधा खूपच खुश होती. सासूबाईंनी सांगितले होते PNG ज्वेलर कडे जाऊन दागिने खरेदी करायचे आहे. तुला आवडेल तसे.
पन्नास तोळे पर्यंत काहीही घे.
तिचा तिच्या कानावर विश्र्वासच बसत नव्हता. पन्नास तोळे...! म्हणजे अर्धा किलो सोने....!
बापरे बाप...!
स्वतःशीच म्हणाली, नाही नाही इतके सोने ना मला सांभाळता येणार. ना घालायला झेपणार !
नकोच !
त्यांना सांगु फक्त दोन बांगड्या, मंगळसूत्र आणि कानातले द्या. माझ्या आईने छोटे मंगळसूत्र केले रोज घालायला.
विचार करतच सोनाराकडे पोहचली. सासरचे आधीच येऊन बसले होते. दोन्ही जावा , सासूबाई आणि तिचा होणारा नवरा सुशांत.
सासूबाई आणि जाऊबाईंनी तर बरेच डिझाइन सिलेक्ट पण करून ठेवले होते.
तिला गेल्यागेल्या सगळे दाखवले. जवळ जवळ साठ तोळे सोने होते.
दागिने इतके देखणे होते की रीजेक्ट करूच शकत नव्हते.
मनाचा हिय्या करून ती म्हणाली, आई इतके दागिने नको मला. त्यातले थोडे बाजूला काढून ती म्हणाली इतके बस...
सासूबाई म्हणाल्या, अग वेडी आहेस का?
या दोघींना त्यांच्या लग्नात इतकेच घेतले. हा.. थोडा डिझाइन चा फरक आहे. आणि आता सुध्दा त्यांनी त्यांच्या साठी एक एक नवीन दागिना घेतला.
पण आई ....
आता पण नाही आणि बिन नाही.
फक्त आवडले नसेल तर सांग.
नाही आई सगळेच छान आहे.
झाले तर मग.
दागिने खरेदी करून लगेच साड्या घ्यायला गेले.
सासूबाई आणि होणारा नवरा पुढे होते. दोन्ही जावा आणि ही मागे होत्या.
मोठ्या जाऊबाई म्हणाल्या, सुधा एक गोष्ट विचारू. विचारा ना ताई!
सुशांत कसा वाटला ग तुला.
का?
असे का विचारता?
नाही ग!
तुला अख्खं आयुष्य त्याच्या बरोबर काढायचे आहे म्हणून विचारते.
खूप चांगले आहेत.
मुख्य म्हणजे स्त्री चा आदर करणारे आहेत.
नक्की ना!
हो ताई!
मग तू नशीबवान बाई !
ताई काय झाले ?
काही नाही!
नाही ताई काहीतर आहे जे तुम्हाला मला सांगायचे आहे.
पण सांगवत नाही.
नाही ग!
आमचा सुशांत आधी पासूनच स्त्रीचा आदर करतो.
म्हणूनच तो हे घर सोडून लांब गेला नोकरी करायला.
इतके पिढीजात श्रीमंत आहेत. इथेच काम केले तरी चालले असते.
पण आपल्या घरात स्त्रीचा सन्मान होत नाही. कित्तेक वेळा या साठी सर्वांसमोर बंड करून उठला. खूप भांडला .
पण आपल्या घरच्या लोकांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. शेवटी गेला नोकरी शोधून. जातांना सांगून गेला, मी या घरात माझ्या बायकोला फक्त दोन दिवसाची पाहुनी म्हणून आणणार.
तुमचे आचार आणि विचार याचा परिणाम माझ्या संसारावर नको.
सुहास दादा, सुजय दादा तुम्ही तरी सुधारा. शिकलेले आहात.
पण बाबा आणि आमच्या दोघींचे नवरे यांच्यात काडीचा फरक पडला नाही.
नेमके काय करतात ही लोक ताई !
काही नाही!
तु चल !
तो बघ सुशांत वळून वळून बघतो.
त्याला वाटत असेल माझ्या बायको सोबत मला जरा सुध्दा वेळ देऊ देत नाही या दोघी महामाया.
आमचा राग राग करत असेल.
असे काही म्हणणार नाही तो. अग तू त्याला अरे तुरे म्हणते!
हो!
बाई तुझ काही खर नाही.
म्हणजे?
बाबा आणि हे दोघे भाऊ फाडून खातील तुला.
मला खातील तेव्हा खातील. आधी तुम्ही सांगा.
तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे . स्त्री च्या आदरा बद्दल आणि या घरा बद्दल.
तुला ते आल्यावर कळेलच.
अर्थात सुशांत घेऊन आला तर!
का नाही घेऊन येणार तो?
मी घेऊन येईल त्याला.
सुधा एक सांगायचे आहे, या घरात आमच्यावर अन्याय होतो आहे. फक्त तसाच अन्याय तुझ्यावर झाला तर गप्प बसू नकोस. कमवती आहेस. स्वतःच स्वतःचा भार उचलू शकते.
मधल्या जाऊबाई बोलल्या. हो वेळीच बंड करून उठ. नाहीतर....!
ताई तुम्हाला नेमके काय सांगायचे आहे. मला काहीच कळत नाही.
चला पटापट! सुशांत चा आवाज आला. पाठोपाठ सासूबाई पण बोलल्या. या ग लवकर. काय रमत गमत चालल्या.
सुधा च्या डोक्यात सतत हेच विचार घोळत होते.
आता कुणीच काही सांगणार नाही आणि सुशांत ला पण आताच याबद्दल विचारणे योग्य नाही. तूर्तास हा विषय इथेच संपवू.
लग्न झाल्यावर बघू. जाऊबाई नक्की बोलतील.
नाहतर आपण बोलत करू.
साड्यांची खरेदी झाली.
ती घरी गेली. डोक्यातून विचार जातच नव्हते.
काय असेल या तीन पुरुषांचे विचार?
काय त्रास असेल या घरातील स्त्रियांना?
विचारात झोपी गेली.
थोड्याच दिवसात
थाटात लग्न पार पडले. पूजा आटोपली, रिसेप्शन झाले. सुशांत म्हणाले, आम्ही हनिमून ला चाललो. तिकडूनच एक दिवस हिच्या माहेरी जाऊन नोकरीच्या गावी जावू.
फोन करत राहू. आता अधेमधे येणे होणार नाही. डायरेक्ट दिवाळीला येऊ.
निघतो आम्ही...
सुधा च्या डोक्यात पुन्हा चक्र सुरू होते.
सर्वांच्या पाया पडली. मोठ्या जाऊबाई म्हणाल्या चल सुधा देवघरात देवाच्या पाया पडून घे.
सुधा आणि दोघी जावा देवघरात आल्या. मोठ्या जाऊबाईन्नी कुंकू लावले. मग म्हणाल्या कधीतरी एकटी एखादी चक्कर मारशील का?
सुशांत येणार नाही. पण तू ये. आधार वाटायला लागला तुझा.
हो ताई, नक्की येते.
सुशांत आणि सुधा जायला निघाले.
सुधा च्या डोक्यात एकच चक्र . काय प्रोब्लेम असेल या घरातील स्त्रियांचा. एकदा एकटे येऊन बघूच.
रोज व्हिडिओ कॉल, फोन चालूच होते. एक दिवस तिच्या लक्षात आले. मोठ्या जाऊबाईंचा डोळा सुजला आहे.
तिने फोनवर विचारले सुध्दा. पण त्यांनी असेच थातुर मातुर कारण सांगून वेळ मारून नेली.
सुधा चे समाधान झाले नाही.
एक दिवस तर सासूबाईंच्या हातावर वळ होते.
ती खूप अस्वस्थ झाली. कुणीच काही बोलत नव्हते.
सुशांत सगळे माहिती असूनही गप्प होते.
आता लग्नाला तीन महिने होत आले होते.
एक दिवस ती सुशांत ला म्हणाली आई बाबांची खूप आठवण येते.आठ दिवस जाऊन येऊ का?
मी पण येतो, सोबत जाऊ दोन दिवसात परत येऊ.
नाही रे !
दोन दिवसाच्या भेटीने माझे पोट भरणार नाही. मी पुढे जाते. हवे तर तू मागून ये.
Ok सरकार म्हणून त्याने तिला अनुमती दिली.
नेमके ती जायच्या दिवशी त्याची अर्जंट मीटिंग होती. त्यामुळे बस स्टॉप वर सोडायला आला नाही.
तिने डायरेक्ट सासरची बस पकडली. सासरी येऊन पोहचली. एकटीच आली म्हणून दोन्ही जावा खूप खुश होत्या.
दोन दिवस हसत खेळत गेले.
एक दिवस रात्रीचे बारा वाजले असतील. सुजय दादाच्या खोलीतून मारल्याचा आणि रडल्याचा आवाज येत होता.
नेमकी सुधा त्या वेळी पाणी घ्यायला म्हणून स्वयंपाक घरात जात होती.
आवाज ऐकून ती दाराशी उभी राहिली. आतला कानोसा घेतला.
दादा वहिनीला मारत होते. आणि वहिनी अहो नका मारू ना!
इतका कोणता मोठा गुन्हा केला ते तरी कळू द्या.
आता सुधाला गप्प राहणे अशक्य झाले. तिने जोरजोरात दार वाजवले. वहिनी दार उघडा, दादा दार उघडा.
मुलांनी कसे बसे दार उघडले. आणि दोघे एकमेकांना बिलकुल सुधा च्या मागे लपले.
दादा काय झाले?
का मारताय असे ढोरा सारखे?
ये!
तू आमच्या मध्ये पडू नको!गपचूप तुझ्या रूम मध्ये जा!
मुलं म्हणाली, काकु आईला वाचावं. आईने काहीच केले नाही.
रात्री झोपायला आले, आईला म्हणाले भाजी कोणी केली. आई म्हणाली मीच केली.
तर खूप घाणेरड्या शिव्या दिल्या आणि मारायला सुरुवात केली.
का तर म्हणे मीठ जास्त होत.
तोवर सगळे सुजयच्या रूम बाहेर गोळा झाले होते.
मोठ्या जाऊबाई मनोमन खुश झाल्या. निदान कोणीतरी जाब विचारला या नराधमांना.
सुधा ने हातात मोबाईल घेतला. थांबा आता पोलिसांनाच फोन करते.
गावातील प्रतिष्ठित लोक तुम्ही. लोकांना तर माहितीच नाही या प्रतिष्ठित घरात काय चालत ते?
शिवाय पत्रकार बोलवते. उद्या पेपरात ही बातमी यायलाच हवी.
भाजीत मीठ जास्त पडले म्हणून, गावातील उच्चभु घरातील स्त्रीला मारहाण.
आता मात्र सुजय ची टरकली. त्याला घाम फुटला.
सुधा प्लीज असे काही करू नको. या गावात खूप मान आहे आम्हाला.
दादा गावात मान असून काय उपयोग हो!
घरातल्या स्त्रीचा सन्मान करता येत नाही. कोण म्हणत तुम्ही श्रीमंत आहात?
तुमच्या सारखे गरीब तुम्हीच.
तुम्ही ,सुहास दादा इतकेच काय बाबा सुध्दा आपल्या बायकोवर हात उगारला कमी करत नाही. कारण अगदी शुल्लक.
पंधरा दिवसांपूर्वी मी व्हिडिओ कॉल केला होता. आईच्या हातावर वळ होते.
सूना घरात आल्या, नातवंडं झाली. तरीही तुम्ही असे वागता.
लाज कशी वाटत नाही तुम्हाला. आता कळले सुशांत मला इथे का येऊ देत नाही ते. त्याला असे वागणे कधीही खपणार नाही.
सुधा ने १०० नंबर डायल करायला घेतला.
आता सासरे पुढे आले. सुधा चुकलो आम्ही. आम्हाला माफ कर. यापुढे या घरात कोणीही बायकोवर हात उगरणार नाही. मी खात्री देतो.
आज पासून तुझ्या मनासारखे होईल.
म्हणजे कसे बाबा?
हे घर स्त्रीचा सन्मान करेल.
कोणीही हात उचलणार नाही. इतकंच काय, साधी शिवी सुध्दा देणार नाही.
पोलीस, पत्रकार यांना बोलवू नकोस.आम्ही तुझ्यापुढे हात जोडतो.
ठीक आहे बाबा!
या घरची सून म्हणून मलाही कधीच वाटणार नाही माझ्या घरची इज्जत चव्हाट्यावर यावी.
झोपा तुम्ही!
येते मी!
फोन हातात घेतला, हॅलो सुशांत मी बोलते. सुधा इतक्या रात्री फोन केला.
सॉरी सुशांत , मी तुला न सांगता आपल्या घरी आले.
तीन महिने झाले. मी घरी व्हिडिओ कॉल करते. सारखे कोणाच्या कोणाच्या तरी अंगावर मारल्याच्या जखमा असतात.
इथे आल्यावर प्रत्यक्ष डोळ्याने पाहिले. सगळे खूप भयानक आहे रे!
सूना, नातवंडं असून बाबा सुध्दा आईला मारायला कमी करत नाही. लाजिरवाणी गोष्ट आहे.
म्हणूनच तू हे गाव सोडून बाहेरगावी नोकरी करायला गेलास ना!
हो!
मला हे सगळ नाही बघवत होत !
खूप प्रयत्न केला मी या लोकांचे मन परिवर्तन करायचा.
हे लोक म्हणजे गाढवा पुढे गीता वाचल्या सारखं
जाऊ दे!
तु कधी येते?
ते कधीच सुधारणार नाही.
दोन दिवसाने येते.
आता परिवर्तन झाले त्यांच्यात. यापुढे असे होणार नाही!
काय?
सगळ्यांची यातून सुटका केली.
कशी ?
पोलीस आणि पत्रकारांचा धाक दाखवून.
यापुढे आपले घर नेहमी हसत, खेळत आणि आनंदात दिसेल.
ओह!
धन्यवाद मॅडम!
बंदा कायम आपल्या ऋणात राहील.
जे काम मी तीस वर्षात करू शकलो नाही ते तू तीन महिन्यात करून दाखवले.
दोन्ही वहिनी आणि आईंनी आज पहिल्यांदा सुटकेचा निःश्वास सोडला असेल.
खूप खूप धन्यवाद बायको..
उद्या मी येतो.
तुझे आभार मानायला आणि
न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगून सुटका झालेल्या कैद्यांचे स्वागत करायला.
खरच!
हो ! खरच येतोय!
त्यांच्या सोबत मलाही सुटकेचा निःश्वास टाकायचा आहे.
©️®️

सौ. प्रभा कृष्णा निपाणे
कल्याण.
कृपया लेख नावानिशी शेअर करावा. परवानगी शिवाय वाचन ,अभिवाचन करू नये.